Ad will apear here
Next
डॉ. वसंतराव देशपांडे, मारियो मिरांडा, दिनकर केशव बेडेकर
हिंदुस्तानी संगीतशैलीतील प्रसिद्ध गायक, मराठी संगीत रंगभूमीवरील अभिनेते डॉ. वसंतराव देशपांडे, प्रसिद्ध व्यंगचित्रकार मारियो मिरांडा यांचा दोन मे हा जन्मदिन. तसेच ख्यातनाम मराठी समीक्षक व विचारवंत दिनकर केशव बेडेकर यांचा दोन मे हा स्मृतिदिन. त्या निमित्ताने, त्यांचा हा अल्प परिचय...
...........
डॉ. वसंतराव देशपांडे
दोन मे १९२० रोजी अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर या गावी डॉ. वसंतराव देशपांडे यांचा जन्म झाला. वसंतराव देशपांडे यांचे शिक्षण नागपूर शहरात झाले. त्यांच्या मातोश्री शिक्षिका होत्या आणि त्या जवळपासच्या देवळांमध्ये ‘भक्तिसंगीत’ म्हणत असत. त्यामुळे संगीताचा वारसा आईच्या उदरातूनच मिळाला होता. शिवाय वयाच्या केवळ सातव्याच वर्षी त्यांना ग्वाल्हेर घराण्याचे शंकरराव सप्रे यांच्या ‘श्रीराम संगीत विद्यालयात’ प्रवेश मिळून खऱ्या अर्थाने त्यांच्या ‘शास्त्रीय संगीताच्या ऐतिहासिक प्रवासाला’ सुरुवात झाली. अर्थात त्याला कारणही खूप सुंदर, अकल्पित व प्रेरणादायी होते…

साल १९२७, नागपुरातल्या तेल्लीपूर परिसरात सात वर्षांचा एक मुलगा आपल्या घराकडे परतत असताना अचानक जोरदार पावसाला सुरुवात झाल्याने एका इमारतीच्या जिन्याखाली त्याने आडोसा घेतला. त्याच्या सहज गुणगुणण्याने मोहित होऊन त्या इमारतीतील एक वयस्कर सद्गृहस्थ खाली येऊन त्याला आपल्या घरात घेऊन गेले आणि तेच गाणे गायला सांगितले. आता तर त्याच्या आवाजावर ते बेहद खूश झाले. पाऊस ओसरल्यावर त्याला सोबत घेऊन त्याच्या घरी पोहोचले. ‘या मुलाच्या गळ्यात गाणे आहे व मी याला ‘शास्त्रीय संगीत’ शिकवण्यास तयार आहे. तुम्ही याला माझ्याकडे सोपवा,’ अशी गळ त्यांनी त्या मुलाच्या आईला घातली! ‘आमची आर्थिक कुवत नाही व त्याच्या शिकवणीचे पैसे मी देऊ शकणार नाही,’ या कारणास्तव त्याच्या आईच्या नकारावर, ‘मी कोणतीही फी घेणार नसून शाळा संपल्यानंतर त्याच्या सोयीने संध्याकाळी शिकवणार आहे,’ असे आश्वासन त्यांनी दिल्याने आईने होकार देत समाधान व कृतज्ञता व्यक्त केली. त्या पावसाळी दिवसाने वसंतराव देशपांडे यांच्या आयुष्याला ऐतिहासिक कलाटणी मिळाली. वयाच्या केवळ सातव्याच वर्षात ग्वाल्हेर घराण्याचे शंकरराव सप्रे यांच्या ‘श्रीराम संगीत विद्यालय’मध्ये प्रवेश मिळवून ‘शास्त्रीय संगीत’ हा त्यांचा ’ऐतिहासिक प्रवास’ खऱ्या अर्थाने सुरू झाला.

वसंतराव देशपांडे यांनी ‘हिंदी चित्रपट संगीत’ फारसं गायलंच नाही. किंबहुना नन्हे मुन्ने (१९५२), चाचा चौधरी (१९५३) व रंगबिरंगी (१९८३) या तीनच चित्रपटांत त्यांनी गायल्याची नोंद आहे. त्यांची गायकी ही ठुमरी, दादरा, ख्याल, टप्पा व भजन याच प्रकारांमध्ये वैशिष्ट्यपूर्ण राहिलेली आहे. वयाच्या केवळ आठव्याच वर्षी, त्यांची ‘गायनकला’ जाणून ‘भालजी पेंढारकर’ यांनी ‘कालियामर्दन’ या त्यांच्या चित्रपटात ‘कृष्णाच्या भूमिकेत पदार्पण’ करण्याची संधी दिली होती. मग एक उत्तम गायक, अभिनेता, ‘मराठी नाटक व चित्रपट संगीतकार’ म्हणून ते गाजले. बेगम अख्तर त्यांना आदराने ‘गुरुजी’ संबोधित करत, यातच त्यांची यशस्वी कारकीर्द दिसून येते. वयाच्या पन्नाशीपर्यंत ‘गझल व ठुमरी’ या संगीत प्रकारातील ‘एक प्रस्थापित गायक’ ही ओळख मिळवूनही रसिकांसमोर ‘ख्याल गायकीची संधी’ त्यांना मिळाली नव्हती, हे विशेष!

‘ग्वाल्हेर घराण्याचे’ अधिकृत शिक्षण घेत असतानाच ‘किराणा व भेंडीबजार’ या घराण्याच्या ‘वैशिष्ट्यपूर्ण चीजा’ वसंतराव देशपांडे यांनी आत्मसात केल्या होत्या. पु.ल. देशपांडे यांचा वसंतरावांवर खास लोभ होता. पु.ल. देशपांडे यांनीच ‘अनेक उस्ताद’ असणाऱ्या या ‘शागीर्द’ला ‘एकलव्य’ ही उपमा/पदवी बहाल केली होती. मग अर्थातच, ‘परिपूर्ण गायक’ हा दर्जा प्राप्त केल्यानंतर त्यांनी आपल्या सगळ्या ‘उस्तादांच्या कृपेने’ त्या प्रत्येकाच्या ‘घराण्याच्या गायकीतील सत्त्व’ आपल्या गळ्यात उतरवून ‘स्वत:च्या खास अशा गायकीला’ जन्म दिला. ‘पंडित दीनानाथ मंगेशकर’ यांच्या ‘संगीत नाटकांचा’ तो काळ होता. त्यांची ‘स्टाइल’ वसंतरावांना इतकी भावली की, ‘कळत नकळत’ त्यांनी आपल्या गायकीमध्ये ‘दीनानाथांची स्टाइल आत्मसात केली’, जी प्रकर्षाने व हुबेहूब जाणवत असे, ज्याचा वसंतरावांना ‘सार्थ अभिमान’ होता, हेही विशेषच!

वसंतराव देशपांडे १९३८ साली मॅट्रिक झाले. लाहोरमध्ये रेल्वे खात्यात नोकरीस असणाऱ्या त्यांच्या मामांनी ‘आपली संगीताची विशेष आवड व भाच्याचा गाता गळा’ या संयुक्त विचारांनी प्रेरित होऊन वसंतरावांना आपल्या सोबत लाहोरला घेऊन आले. आणि इथूनच त्यांच्या आयुष्याला एक सुंदर कलाटणी मिळाली. तेथील दोन वर्षांच्या वास्तव्यात लाहोर व आजूबाजूच्या परिसरात ‘अफाट भटकंती, उर्दू भाषा शिक्षण व संगीत साधना’ यावरच त्यांनी आपले लक्ष केंद्रित केले. त्याच अंतर्गत उस्ताद बडे ‘गुलाम अली खाँ व उस्ताद बरकत अली खाँ’ या बंधूद्वयीची मैफल कधीही चुकवली नाही. ‘ठुमरी व गझल’ या गायनकलेचा सूक्ष्मात जाऊन अभ्यास केला. याच काळात त्यांना ‘असद अली खाँ’ नामे एका फकिराच्या गाण्याने मोहित केले. ते एका जमान्यात ‘पतियाळा घराण्याचे गायक’ असल्याची माहिती मिळताच वसंतरावांनी त्यांचा गंडाच बांधला. मग जवळपास सहा महिने केवळ ‘मारवा’ हा एकच राग त्यांच्यापाशी शिकले. १९४२मध्ये लाहोरहून परतल्यावर मग त्यांनी अर्थार्जनासाठी पुण्यात ‘मिलिटरी अकाउंट्स’ खात्यात नोकरी व संगीतसाधनेसाठी ‘पंडित सुरेशबाबू माने’ यांचे शिष्यत्व (१९४२-१९५२) पत्करले. मग त्यांना ‘भेंडीबजार घराण्याच्या उस्ताद अमजद अली खान’ यांचे मार्गदर्शन लाभले. 

याच काळात त्यांनी जवळपास ‘८० मराठी व दोन हिंदी’ चित्रपटांसाठी पार्श्वगायन केले. पुण्यातील वास्तव्यात त्यांना ‘पु. ल. देशपांडे, हिराबाई बडोदेकर, पंडित भीमसेन जोशी व बेगम अख्तर’ या दिग्गजांचा सहवास लाभला व शेवटपर्यंत हेच त्यांचं ‘अत्यंत जवळचं व लाडकं मित्रमंडळ’ राहिलं! ‘कट्यार काळजात घुसली’ या संगीत नाटकाने ‘पंडित वसंतराव देशपांडे व अभिजात संगीत’ यांना सामान्य प्रेक्षकांच्या समोर आणले व याच नाटकाच्या माध्यमातून त्यांना ‘अमाप प्रसिद्धी व रसिकाश्रय’ लाभला. १९६७ साली या नाटकाचा पहिला प्रयोग झाला आणि ‘नाटक, नाट्यसंगीत व अभिजात संगीत’ रसिकांनी हे नाटक अक्षरश: डोक्यावर उचलून घेतलं. यातील ‘खानसाहेब ही व्यक्तिरेखा’ रसिकांच्या मनात इतकी ‘भरली, ठसली व सामावली’ की त्यांना पु.ल. देशपांडे यांनी बहाल केलेली ‘वसंतखाँ देशपांडे’ ही पदवी ‘खुशीखुशी व आनंदे’ ‘स्वीकारली, रुजवली व संबोधली’, असे उदाहरण एकमेव! 

या नाटकातील ‘खानसाहेब’ या व्यक्तिरेखेच्या पदांना चाली लावताना ‘पंडित जितेंद्र अभिषेकी’ यांच्या मनात ‘पंडित वसंतराव देशपांडे ही व्यक्ती, त्यांची गायकी व स्टाइल’ होती, हे म्हणणे धाडसाचे ठरणार नाही! १९६७ ते १९८१ या १४ वर्षांच्या कालावधीत या नाटकाचे जवळपास ५२७ प्रयोग झाले यावरूनच ‘वसंतरावांच्या गायकीची जादू व रसिकाश्रय’ याची प्रचीती येते. यासोबतच दूरदर्शनसाठी त्यांनी गायलेली ‘अवीट गोडीची भजने व सुगम संगीत’ रसिकांच्या ओठांवर रुळलेले होतेच. ‘अष्टविनायक’ या चित्रपटातील त्यांनी गायलेली गाणी ‘आजही गणेशोत्सवात’ आपलं अस्तित्व टिकवून आहेत. कारण त्या तोडीची अवीट ‘गणेशवंदना’ आजतागायत तयार झालीच नाही, हेच खरं. किंबहुना म्हणूनच ‘नाटक, चित्रपट व संगीत रसिक’ व रसिकोत्तर सामान्यांच्याही हृदयात वसंतरावांचं अढळपद चिरंतर आहे. 

१९६५ साली त्यांनी नोकरीला रामराम ठोकून आपलं उर्वरित आयुष्य ‘भारतीय शास्त्रीय संगीत’ सेवेला वाहून टाकलं! १९६७ ते १९७७ हा दहा वर्षांचा अतिशय मोठा कालावधी ‘कट्यार काळजात घुसली’ या नाटकाने व्यापून टाकल्याने रसिकांना वसंतरावांच्या ‘शास्त्रीय संगीत साधना’ याचा हवा तेवढा लाभ मिळू शकला नाही, ही खंत आजही आहे. परंतु ‘मराठी नाट्यसंगीताची वाटचाल’ सोबतच त्यांच्या ‘ऑडिओ सीडी व डीव्हीडी’ बंदिस्त ‘रागदारी मैफली’ रसिकांच्या संग्रही असून, त्यांची ‘अभिजात संगीताची’ भूक, मन व कान’ तृप्त करत आहे. १९८३मध्ये वसंतराव देशपांडे यांना संगीत कला अकादमी पुरस्कार’ प्राप्त झाला. 

वसंतराव देशपांडे यांचे नातू ‘राहुल देशपांडे’ यांनी ‘कट्यार काळजात घुसली’ या नाटकाच्या यशस्वी सादरीकरणानंतर ‘संगीत संशयकल्लोळ’ हे नाटक पुनश्चश रंगभूमीवर सादर केले आहे. त्यामुळे पुन्हा संगीत नाटकांना चांगले दिवस येत आहेत. वसंतराव देशपांडे यांचे ३० जुलै १९८३ रोजी निधन झाले. (संदर्भ : नितीन देशपांडे)

(बगळ्यांची माळ फुले या गीताचा रसास्वाद घेणारा लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)
.........


मारियो मिरांडा
दोन मे १९२६ रोजी मारियो मिरांडा यांचा जन्म झाला. गोव्याच्या भूमीने अनेक नररत्ने या देशाला दिली आहेत. लोटली गावचे मारिओ मिरांडा हे त्यातलेच एक. देशातील आघाडीच्या वर्तमानपत्रांतून, साप्ताहिकांतून मारिओ मिरांडा यांची व्यंगचित्रे प्रसिद्ध होत असत. नुसती व्यंगचित्रेच नव्हे, तर मारिओ मिरांडा यांनी अनेक पोर्ट्रेट्ससुद्धा तितक्याच ताकदीने काढलेली असत. टाइम्स ऑफ इंडिया आणि इलस्ट्रेटेड वीकलीमधील व्यंगचित्रांसाठी मिरांडा हे प्रसिद्ध होते. मारियो मिरांडा यांना कोकणी आणि पोर्तुगीज या दोनच भाषा येत होत्या. परंतु पुढे बेंगळुरूला शिक्षणासाठी गेल्यावर त्यांचा संबंध इंग्रजी भाषेशी आला. 

शाळेत असताना त्यांना घरातील भिंतीवर रेषाचित्रे काढायची सवय होती. त्यांच्या सततच्या भिंतीवरील चित्रे काढायच्या सवयीमुळे त्यांच्या आईने त्यांना चित्र काढण्याची वही आणून दिली. त्या वहीला मिरांडा डायरी म्हणत असत. मारिओ मिरांडा यांना पहिल्यांदा व्यंगचित्रकार म्हणून ब्रेक दिला तो ‘करंट’ साप्ताहिकाने. त्यानंतर वर्षभरात टाइम, टाइम्स ऑफ इंडिया, फेमिना आणि इकॉनॉमिक टाइम्स या दैनिकात त्यांची व्यंगचित्रे प्रकाशित होत होती. मारिओ मिरांडा यांचे काम पाहून त्यांचा स्पेन, लंडन, पोर्तुगाल आदी देशांनी सन्मान केला. मारिओ मिरांडा यांनी व्यंग्य शैलीत लोकजीवनाची चित्रे केली, त्यांची प्रदर्शने २२ देशांत भरली. अमेरिकेच्या सरकारी निमंत्रणावरून १९७४ मध्ये केलेला त्या देशाचा दौरा आणि तिथे ‘पीनट्स’ या कॉमिकचे निर्माते चार्ल्स शूल्ट्झ यांच्यासह काम करण्याची मिळालेली संधी ही आयुष्यातली मोठी उपलब्धी होती, असे मारिओ सांगत. 

मुंबईला कर्मभूमी मानणारे मारिओ निवृत्तीनंतर गोव्यातच राहिले. मुंबईतले सहकारी गेऱ्हार्ड डकुन्हा, दिवंगत कादंबरीकार मनोहर माळगावकर अशा मोजक्या मित्रांनी मारिओ यांच्याविषयी वेळोवेळी लेखन केले आहे. भारत सरकारने १९८८ साली पद्मश्री आणि २००२ साली त्यांना पद्मभूषण देऊन गौरवले होते. गुगलनेही एकदा मारियो मिरांडा यांच्या जयंतीनिमत्त विशेष डूडल बनविले होते. मारिओ यांचे ११ डिसेंबर २०११ रोजी निधन झाले.

उत्तर गोव्यात बारदेश प्रांतात मांडवी नदीच्या किनारी आणि राजधानी पणजीच्या समोर असलेल्या टेकडीवर पोर्तुगीजांनी बांधलेला रेस मागोस हा किल्ला आहे. या किल्ल्यात मारिओ मिरांडा यांच्या चित्रांचे भव्य कलादालन आहे. या किल्ल्यात त्यांच्या चित्रांचे सुंदर दालन पाहायला मिळते. किल्ल्यात प्रवेश केल्यानंतर समोरच काही पायऱ्या चढून एका इमारतीत या किल्ल्याचा इतिहास भिंतीवर लिहिलेला आहे आणि त्याचे एक लाकडी मॉडेल करून ठेवले आहे. त्याच्यासमोर असलेल्या मोठ्या दालनात मिरांडांची चित्रे लावली आहेत. मारिओ मिरांडा यांच्या चित्रांत अनेक विषय हाताळलेले दिसतात. छत्रपती शिवाजी महाराजांचे चित्र तर निव्वळ देखणे आहे. मिरांडा १९७४ साली अमेरिकेला गेले होते. त्या वेळी त्यांच्यातल्या व्यंगचित्रकाराला दिसलेले अमेरिकेतील लोकजीवन त्यांनी आपल्या खास व्यंगचित्रकाराच्या नजरेने टिपलेले दिसते. किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या बंकरसारख्या वास्तुरचनेतसुद्धा मिरांडा यांनी काढलेली विविध चित्रे प्रदर्शित केलेली आहेत.
..........
दिनकर केशव बेडेकर
आठ जून १९१० रोजी सातारा येथे दिनकर केशव बेडेकर यांचा जन्म झाला. ते एक महान साहित्यिक, विचारवंत, तत्त्वचिंतक व समीक्षक होते. महाराष्ट्रामध्ये वाहणाऱ्या हजारो सामाजिक, राजकीय, साहित्यिक, तार्किक, धार्मिक व तात्त्वज्ञानिक विचारप्रवाहांना व मतधारांना जोडणारा पूल त्यांनी आपल्या सिद्धहस्त लेखणीच्या माध्यमातून साकारण्याची अनोखी कसरत केल्यामुळे त्यांच्या नावाभोवती प्रसिद्धीचे एक वेगळे वलय निर्माण झाले. किर्लोस्कर, स्त्री, नवभारत अशा विविध नियतकालिकांमधून त्यांनी अनेक वर्षे विपुल लेखन करत, विविध संवेदनशील विचारांना स्पर्श केला. 

निर्भीड व पारदर्शी लेखांप्रमाणेच त्यांनी केलेली साहित्य समीक्षादेखील आज त्या विषयांसाठी मार्गदर्शक मानली जाते. नवकाव्य, नवकथा, सौंदर्यमीमांसा, अस्तित्ववाद, चित्रकलेतील नवप्रवाह अशा वेगवेगळ्या विचारप्रणालींचे उत्खनन करून त्यात आपल्या बुद्धीचा व तात्त्विक निकषांचा अर्क टाकून त्याचा अर्थसुद्धा रसिकांपर्यंत पोहोचवला. दिनकर बेडेकरांच्या लेखणीने त्यांच्या नियमित वाचकांच्या मनातील प्रगल्भ विचारांची दालने उघडण्याचा सदैव प्रयत्न केला, असे म्हटले तरी वावगं ठरणार नाही. भारताच्या राजकीय, सामाजिक व तार्किक सक्षमीकरणाचे ध्येय डोळ्यांसमोर ठेवून, बेडेकरांनी तब्बल ६००हून अधिक लेख लिहिले. हिंदी उद्योगधंद्यात राबणाऱ्या स्त्रिया व मुले (१९३६), संयुक्त महाराष्ट्र (१९४७), सुमित्रानंदन पंत (१९४८), अणुयुगातील मानवधर्म (१९७१) , टुवर्ड्स अंडरस्टँडिंग गांधी (१९७५), धर्मचिंतन (१९७७) आणि धर्मश्रद्धा : एक पुनर्विचार (१९७७) ही त्यांची महत्त्वाची पुस्तके. 

समाजवाद प्रेरणा व प्रक्रिया हा बेडेकरांच्या गौरवार्थ काढण्यात आलेला ग्रंथ १९७१ मध्ये प्रसिद्ध झाला. आधुनिक मराठी काव्यः उदय, विकास, आणि भवितव्य, तसेच अस्तित्ववादाची ओळख ही स्वतंत्र पुस्तकेदेखील दिनकर बेडेकरांनी लिहिली आहेत. स्वातंत्र्योत्तर काळातील एक आघाडीचे तत्त्वचिंतक, समीक्षक ह्या नात्याने त्यांनी मांडलेल्या प्रमेयांना कायमची विचारार्हता लाभलेली आहे. दिनकर केशव बेडेकर यांचे निधन दोन मे १९७३ रोजी झाले.

माहिती संकलन : संजीव वेलणकर
.......
दोन मे जन्मदिन 
इंग्लंडच्या फुटबॉल संघाचा माजी कर्णधार आणि जगभरातल्या फुटबॉलप्रेमींच्या गळ्यातील ताईत डेव्हिड बेकहॅम (२ मे १९७५)
वेस्ट इंडीजचा अद्वितीय फलंदाज ब्रायन लारा (२ मे १९६९)
शिवसेना नेते अनिल देसाई (२ मे १९५८)
........
थोर साहित्यिक व गीतकार शांताराम आठवले यांचा २ मे हा स्मृतिदिन. त्यांच्याबद्दल अधिक वाचण्यासाठी येथे क्लिक करा. 






 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/MZYWCM
Similar Posts
अब्दुल हलीम जाफर खान, पं. उल्हास बापट, सर आयझॅक पिटमॅन ज्येष्ठ सतारवादक अब्दुल हलीम जाफर खान, ख्यातनाम संतूरवादक पं. उल्हास बापट आणि लघुलिपीचे (शॉर्टहँड) जनक सर आयझॅक पिटमॅन यांचा चार जानेवारी हा स्मृतिदिन. त्या निमित्ताने त्यांचा हा अल्प परिचय...
रामदास पाध्ये, हंसा वाडकर, सुभाष घई, जे. ओमप्रकाश बोलक्या बाहुल्यांचे खेळ प्रसिद्ध करणारे शब्दभ्रमकार रामदास पाध्ये, मराठी अभिनेत्री-नृत्यांगना रतन साळगावकर ऊर्फ हंसा वाडकर, राज कपूरनंतर ‘शोमॅन’ या पदावर आरूढ झालेले एकमेव निर्माते-दिग्दर्शक सुभाष घई, प्रख्यात दिग्दर्शक, निर्माते जे. ओमप्रकाश यांचा २४ जानेवारी हा जन्मदिन. त्या निमित्ताने, त्यांचा हा अल्प परिचय
डॉ. सतीश धवन, अरविंद देशपांडे, जॉय अॅडम्सन नामवंत अंतराळशास्त्रज्ञ डॉ. सतीश धवन, ख्यातनाम अभिनेते अरविंद देशपांडे आणि वन्यजीवनाबद्दल लेखन करणाऱ्या लेखिका जॉय अॅडम्सन यांचा तीन जानेवारी हा स्मृतिदिन. त्या निमित्ताने त्यांचा हा अल्प परिचय...
प्रा. मधू दंडवते, शांताराम आठवले समाजवादी नेते, अर्थतज्ज्ञ व समाजसेवक प्रा. मधू दंडवते आणि नामवंत साहित्यिक व गीतकार शांताराम आठवले यांचा २१ जानेवारी हा जन्मदिन. त्या निमित्ताने, त्यांचा हा अल्प परिचय...

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language